स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.अनेक पक्ष नेत्यांना गळ घालत त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत आहे. महायुतीमधील भाजप, अजित पवार आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मोठी इनकमिंग करण्यात आणि आपली ताकद वाढवण्याच्या शर्यतीत आता महायुतीमधील तिन्ही पक्ष एकमेकांचे नेत्यांना गळ घालत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाला जबर धक्का दिलाय. थेट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडलाय. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास पाटील हे राष्ट्रवादी पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते पळवल्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्ष स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी आपली ताकद वाढवत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र पण जेथे युती होणं शक्य नाही तेथे स्वबळावर निवडणूक लढवू, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वृत्ताला कैलास पाटील यांनी दुजोरा दिलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. आपल्याला कुणावरही आरोप करायचे नाहीत. एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली. शिवसेना माझा जुना पक्ष आहे. यामुळे समर्थकांसह त्यात पुन्हा प्रवेश करत आहे, असे कैलास पाटील यांनी सांगितले. दरम्यान संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. यावेळी एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात पाटील शिवसेनेत प्रवेश करतील. याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीनं दिलंय.
कोकणातही शिंदे गट आपली ताकद वाढवत आहे. एकनाथ शिंदेंनी सामंत बंधूंकडे म्हणजेच उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडे पक्षाच्या मोर्चेबांधणीची कमान सोपवलीय. दोन्ही सामंत बंधू पक्षाचे विस्तारात असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणत आहेत.