अहिल्यानगर -डाळिंब बागेच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादामुळे एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण पोपट ठोंबरे (वय 32 रा. तांदळी वडगाव, ता. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, सदरची घटना 21 मे 2024 रोजी सायंकाळी घडली असून यासंदर्भात 10 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पोपट दशरथ ठोंबरे (वय 67 रा. तांदळी वडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नितीन बबन शिंदे (रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी गुरूवारी (11 सप्टेंबर) ताब्यात घेतले. फिर्यादीचा मुलगा किरण ठोंबरे यांनी आपल्या शेतातील डाळिंब बागेचा व्यवहार नितीन शिंदे याच्यासोबत केला होता. सन 2023-24 मध्ये झालेल्या या व्यवहाराची किंमत 10 लाख 50 हजार रूपये ठरली होती. त्यानुसार संशयित आरोपीने ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादीच्या पत्नीच्या खात्यावर 3 लाख 49 हजार रूपये इतकी रक्कम जमा केली. परंतु त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास संशयित आरोपीकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आली.
या संदर्भात किरण ठोंबरे यांनी संशयित आरोपीकडे अनेक वेळा उर्वरित पैसे मागणी केली असता संशयित आरोपी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत होता. अखेर सततच्या मानसिक त्रासामुळे व आर्थिक ताणामुळे किरण ठोंबरे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, किरण ठोंबरे याचा मोबाईल त्यांच्या बहिणीला मिळाला असता यामधून नितीन शिंदे याने किरणला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे समोर आले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नितीन शिंदे याला ताब्यात घेतले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करीत आहेत.


