Tuesday, November 4, 2025

अहिल्यानगरमध्ये भरधाव कंटेनरच्या धडकेत 7 वाहनांचे नुकसान ,शिक्षक जखमी

अहिल्यानगर-भरधाव कंटेनरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने शिक्षक जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना शहरातील डी. एस. पी. चौकात शनिवारी (13 सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी शिक्षक सागर दिनकर चिकने (वय 31 रा. स्टेट बँंक कॉलनी, तहसील कार्यालयाच्या पाठीमागे, शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. जगप्रित कश्मिर सिंह (रा. व्ही. पी. ओ. चौधरीवाल, बाटाला, गुरदासपुर, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. डी. एस. पी. चौकातील पंचवटी हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. फिर्यादी आपल्या (एमएच 12 एक्सएच 9638) या कारमधून जात होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या (एचआर 55 एएल 8704) या कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादी जखमी झाले. तसेच, पंचवटी हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या इतर सहा वाहनांना या कंटनेरची धडक बसून त्यांचे मोठे नुकसान झाले. इतर काही चारचाकी वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पाऊस सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार इस्त्राईल पठाण करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles