माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. राजकारणात मला संपण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही टिकलो. खोट्या आरोपांमुळे काँग्रेस सोडल्याचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं. तसंच मतचोरीवरून आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी सुनावलं. मतचोरी झाली असती तर नाना पटोले अडीचशे मतांनी जिंकले असते का असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केला.
भाजपच्या लातूर ग्रामीण कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर तोफ डागली. त्याचवेळी भाजपची स्तुती केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही अशोक चव्हाणांनी भाष्य केलं.
काँग्रेसमध्ये वनवास भोगावा लागला
आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करताना अशोक चव्हाणांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील प्रसंग मांडला. ते म्हणाले की, “2010 मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप करण्यात आले. त्यावेळी मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. 2008 ते2010 हा माझ्या कारकिर्दीतील शिखराचा काळ होता. पण कुठलीही चूक न करताही मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला.काँग्रेसमध्ये असताना आपल्याला चौदा वर्षे वनवास भोगावा लागल्याची खंत व्यक्त करणाऱ्या अशोक चव्हाणांनी भाजपचे मात्र कौतुक केलं. भाजपमध्ये आपल्याला मान-सन्मान मिळाला असं म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केलं. भाजपने आपल्याला सन्मानाने पक्षात प्रवेश दिला त्यामुळे आपण आज खासदार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.


