राहुरी: गाईचे दुध खाली सांडले असता वडिल मुलाला बोलले, त्याचा राग आल्याने मुलाने वडिलांना लाथाबूक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली.
भानुदास दगडू काळे, वय 57 वर्षे, रा. उंबरे, गणपती चारी, ता. राहुरी, हे दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता गायांचे दुध काढत होते. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा गणेश काळे याच्याकडून गाईचे दुध खाली सांडले. तेव्हा वडिल त्याला म्हणाले की, का रे बाबा गणेश, एक तर दुधाला भाव नाही, त्यात तु बऱ्याच वेळा दूध सांडवितो. त्यामुळे आपल्या कष्टाचा काही उपयोग होत नाही. तू नेहमी दारु पिवून भांडण काढतो असे वडिल म्हणाले. तेव्हा मुलगा गणेश म्हणाला की, तु लई माजला आहे, तुझ्याकडे पाहतो. असे म्हणून त्याने वडिलांना शिवीगाळ करत लाथाबूक्क्यांनी व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली.
तसेच तुला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी तेथे भानुदास यांचा लहान मुलगा दिलीप यांनी भांडण सोडविले. त्यानंतर भानुदास दगडू काळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा गणेश भानुदास काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


