राज्याच्या राजकारणात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये रोहित पवारांचा विजय झाला, तर राम शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर राम शिंदे विधानपरिषदेवर आमदार झाले आणि विधानपरिषदेचे सभापती देखील झाले.
“राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती ही घटनात्मक पदं असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला. पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय, अशी शंका येते. विधानपरिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं”, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
“वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत-जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज..????, एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


