गेल्या आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान वक्फ सुधारणा विधेयक बहुमातेन मंजूर करण्यात आलं. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. मध्यरात्रीनंतर दोन्ही ठिकाणी विधेयक मंजूर झालं. यानंतर शनिवारी ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे त्याचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. मात्र, या विधेयकाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसनं आता विरोधाची ठाम भूमिका घेतली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात पक्षाची स्पष्ट भूमिका मांडली आहे. बुधवारी कोलकात्यामध्ये जैन समुदायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला ममता बॅनर्जी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होत्या. या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबाबत पक्षाची व पश्चिम बंगाल सरकारची भूमिका स्पष्ट केली.पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक लागू होणार नसल्याचं ममता बॅनर्जींनी यावेळी स्पष्ट केलं. “मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे. पण बंगालमध्ये असं काहीही घडणार नाही ज्यातून फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल. सगळ्यांनी एकत्र राहायला हवंय, असा संदेश तुम्ही द्या”, असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
“राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा”, असं आवाहनदेखील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थितांना केलं.मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकावरून हिंसाचार झाल्याचं समोर आलं असून त्या घटनेचाही उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. “बांगलादेशच्या सीमाभागातील परिस्थिती तुम्ही पाहा. या परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक मंजूरच व्हायला नको होतं. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचं काय करू?”, अस सवाल ममता बॅनर्जींनी यावेळी उपस्थित केला.


