पुरात अडकले आजी अन् दोन वर्षांचा नातू, मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात, बचावकार्याचा व्हिडीओ
महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलेलं असून एनडीआरएफची टीम नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मदतकार्य करत आहे.
दरम्यान, अशा परिस्थितीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत असल्याचं दिसून आलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे बचावकार्य करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच अनुषंगाने परंडा तालुक्यातील वडनेर गावातील एका कुटुंबीयाच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे ते कुटुंबीय घराच्या छतावर अडकून पडलं होतं. मात्र, त्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धावून जात ते स्वत: त्यांच्या बचावासाठी पुराच्या पाण्यात उतरून मदत केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. त्यांच्या या कार्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.


