सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरु केला आहे. काहीवेळापूर्वीच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला. तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली.
यावर अजित पवार यांनी थेट बोलणे टाळले. आपल्या नेहमीच्या शैलीत शेतकऱ्याला थांबवत ते म्हणाले की, मी पण शेतकरी आहे, तू पण शेतकरी आहेस. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते करेल. आता आम्हाला पाहणी तर करु दे. तुमच्यासारख्यांकडून मी काय नुकसान झाले आहे, हे समजून घेत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर अजित पवार यांनी स्पष्टपणे मौन साधल्याचे दिसून आले.
यावेळी कोर्टीतील शेतकऱ्यांनी आमच्या भागात 65 मिलिमीटर पाऊस झाला, असेही म्हटले. हा दावाही अजित पवारांनी खोडून काढला. त्यांनी शेतकऱ्याला म्हटले की, हे डोक्यातून काढून टाक. याठिकाणी 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही. सीना नदीत वरच्या भागातून पाणी आले आणि नदीच्या दुतर्फा हे पाणी शिरले. त्यामुळे शेतीची जमीन खरडून गेली. एका दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाला नाही, तर रोज थोडा थोडा पाऊस झाला. मी डोळ्यांनी सगळी परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे काळजी करु नका, असे सांगत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार आज माढा, मोहोळ या तालुक्यांमध्ये आणि धाराशिव, बीड जिल्ह्यात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोलापूरमधील काही भागांमध्ये जाणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव, परांडा या अतिवृष्टी झालेल्या भागात नुकसानीच्या पाहणीसाठी जाणार आहेत.


