नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावचे सरपंच आणि महाविकास आघाडीचे नेते शरद खंडेराव पवार यांच्यावर राजकीय दबावापोटी अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून आता त्यांना हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे. या प्रकारची सखोल चौकशी करून या दोन्ही कारवाया तातडीने मागे घेण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी खा.निलेश लंके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, युवसेनेचे विक्रम राठोड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के, माजी सभापती प्रवीण कोकाटे, बाबासाहेब गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, डॉ. मारुती ससे, आबासाहेब कोकाटे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हंटले आहे की, सरपंच शरद खंडेराव पवार यांना २२ ऑगस्ट रोजी अर्जदाराच्या बोगस बनावट अर्ज व अतिक्रमण संदर्भातील गटविकास अधिकारी अहिल्यानगर यांच्या चौकशी समिती अहवालाचे कुठल्याही प्रकारचे अवलोकन न करता आजपर्यंत सदर अर्जातील नमूद ठिकाणच्या तिन्ही जागावरील अतिक्रमणाची नोटीस नसताना, अतिक्रमण निश्चिती नसताना, भूमी अभिलेख कार्यालय हद्द निश्चिती नसताना, कुठलाही कागदपत्रे पुरावा नसताना, बेकायदेशीर अपात्रितेची कारवाई झाली आहे. त्यानंतर पोलीस उपविभागीय कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून १९ सप्टेंबर रोजी सरपंच पवार यांना जिल्हा हद्दपारची नोटीस देण्यात आलेली आहे.
सदर दोन्ही प्रकरणे राजकीय दबावापोटी करण्यात आलेले आहेत. सरपंच पवार यांनी मागील १० वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच या पदावर व बाजार समिती, पंचायत समिती या निवडणुका लढवल्याने व आंदोलनाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेले आहेत, त्यांचा समाजकारण व राजकारणातील वाढता प्रभाव पाहता,व पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ही बोगस बनावट कारवाई कटू कारस्थान अधिकाऱ्यांना करावयाला लावलेले आहे.
सत्ताधारी व अधिकारी सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल आहे शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही,याच्याकडे लक्ष न देता.महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणाऱ्यांचा खोट्या कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी याबाबत सखोल चौकशी करून दोन्ही कार्यवाही मागे घेण्यास व नगर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर बोगस बनावट गुन्हे,दाखल करून विविध बोगस कारवाया थांबण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


