नगरसह राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, झेडपी अध्यक्ष आरक्षण आणि पं. स. समिती सभापती आरक्षणानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रतिक्षा आहे.
आधी गट आणि गणाची सुधारित प्रभाग रचना त्यानंतर अध्यक्ष पदाचे आणि पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाईनंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पहिले पाऊल मानले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे.
त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांचा अंतिम व अधिप्रमाणित करून मतदार याद्या व मतदान केंद्र यांची यादी प्रसिध्द करणार आहेत.
मतदारयादीचा कार्यक्रम
* अधिसूचित दिनांक : 1 जुलै 2025
* यादी प्रसिद्धी : 8 ऑक्टोबर 2025
* हरकती मुदत : 14 ऑक्टोबरपर्यंत
* अंतिम प्रसिद्धी : 27 ऑक्टोबर


