Thursday, October 30, 2025

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
आपत्तीच्या काळात कोणीही मुख्यालय सोडू नये
अहिल्यानगर, – जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत प्राधान्याने पूर्ण करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निर्देश दिले. जिल्ह्याला २७ व २८ सप्टेंबरला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून या आपत्तीच्या काळात कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालय सोडू नये, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या आढाव्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा अधीक्षक सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पावसामुळे ज्या भागातील बंधारे व पाझर तलाव नुकसानग्रस्त झाले आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. यासाठी आवश्यक यंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे. आवश्यकता भासल्यास इतर जिल्ह्यातून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून उपलब्ध असलेली यंत्रे वापरून काम प्राधान्याने पूर्ण करावे.
जिल्ह्यात ज्या ठिकाणच्या पूलांमध्ये नुकसान झाले आहे किंवा पुलांचे कठडे तुटले आहेत, ती दुरुस्त करून वाहतुकीला अडथळा येऊ नये, याची काळजी घ्यावी. संपर्क तुटलेल्या गावांचा संपर्क लवकरात लवकर सुधारावा.
आपत्तीच्या काळात गावांमधील वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या गावठाण फीडर तातडीने दुरुस्त कराव्यात. तसेच पाणीपुरवठा योजना अखंडित राहील याचीही खात्री करावी.
पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या लाईन्स बाधित झाल्यास त्यांची दुरुस्ती करावी. प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी पाण्याचे नमुने तपासणे आवश्यक आहे. तसेच पूर आलेल्या गावांमध्ये स्वच्छता करावी, औषधसाठा पुरेसा ठेवावा व पशुधनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
आपत्तीच्या काळात तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी व कृषी अधिकारी टीमवर्कने काम करतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी फील्डवर राहतील,अशा सूचनाही त्यानी दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles