अहिल्यानगर-शनिवार पासून पावसाच्या हस्त नक्षात्राला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ‘पडतील हत्ती तर कोसळतील भिंती’ या मराठी म्हणीप्रमाणे जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस झाला. दुपारी चार वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत बरसत होता. दरम्यान, हवामान खात्याने रविवारी देखील मुसळधार पावसाचा यलो अर्लट दिलेला आहे. यामुळे संभाव्य निर्माण होणार्या परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी प्रशासन सर्तक असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री जिल्ह्याच्या बहुतांशी भागात हस्त नक्षत्राचा मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त होते.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या विसर्गात वाढ करण्यात आला असून जिल्ह्यात नदी काठावर पूरस्थितीचा धोका कायम आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणार्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळीपर्यंत भिमा नदीवर दौंड पूल येथे 8 हजार 222 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 12 हजार 620 क्युसेक, जायकवाडी धरणातून 37 हजार 728 क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून 820 क्यूसेक, निळवंडे धरणातून 1,521 क्यूसेक, ओझर बंधारा 1 हजार 498 क्युसेक, मुळा धरणातून 5 हजार क्युसेक, घोड धरणातून 5 हजार क्युसेक, हंगा नदी विसापूर धरण 550 क्यूसेकख, सीना धरणातून 3 हजार 558 क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 600 क्युसेक, खैरी धरण येथून 5 हजार 233 इतका विसर्ग सुरू होता. दुपार चारनंतर जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली. यामुळे नद्यामधील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्ह्यात निर्माण होणार्या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळता यावेत, यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. यासह पडणार्या पावसावर आणि नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनान लक्ष ठेवून होते.
शनिवारी सकाळी आधी मूळा धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचा विसर्ग हा 2 हजार क्यूसेक होता. दुपारी तीन वाजता तो पाच हजार करण्यात आला. सायंकाळी हा विसर्ग 15 हजार करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले. रात्री पाऊस सुरू राहिल्यास हा विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता असून यामुळे मुळा काठावर पूराच्या पाण्याचा धोका वाढला आहे.


