अहिल्यानगर -दांडिया खेळतांना झालेल्या किरकोळ वादातून एका 21 वर्षीय डिलिव्हरी बॉयवर चाकू आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. ओंकार शिंदे (वय 21, रा. भिंगार) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी ओंकार शिंदे याने दिलेल्या जबाबावरून ओंकार वाघ व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार शिंदे हा गुरुवारी रात्री आपल्या मित्रांसोबत संजोग लॉन येथे दांडिया खेळण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची तोंडओळख असलेल्या ओंकार वाघ याने जवळ येऊन त्याला मजास्त हवेत उडू नकोफ अशी धमकी दिली होती. दांडिया खेळून झाल्यावर रात्री सव्वादहाच्या सुमारास ओंकार शिंदे आपल्या मैत्रिणींना सोडण्यासाठी बोल्हेगाव येथील दत्त मंदिरा जवळून जात होता.
यावेळी पाठीमागून आलेल्या ओंकार वाघ व त्याच्या दोन साथीदारांनी ओंकार शिंदेच्या दुचाकीला धडक देऊन त्याला खाली पाडले. ‘कोणी मध्ये आले तर मारून टाकीन’ अशी धमकी देत ओंकार वाघ याने ओंकार शिंदेच्या पोटावर चाकूने वार केला. तर ओंकार वाघच्या इतर साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात ओंकार शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्ल्यावेळी घाबरल्याने त्याचे मित्र आणि मैत्रिणी पळून गेले. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्याला रुग्णालयात दाखल केले.


