महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे, राज्याला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिप्रचंड नुकसान झालं आहे. पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलंच पण सोबतच शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे. ऐन हाततोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हातबल झाले आहेत. आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेअने क गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक गावांचा सर्पंक तुटला आहे. घरादारात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेल्यानं नागरिक रस्त्यावर आले आहेत. शेतीसोबतच घरादाराचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आता नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजणी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानाची पहाणी केली, यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत, कुठेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. ऑलरेडी आम्ही पैसे रीलीज करायला सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हाप्ता मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


