आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूरमधील जनतेने एमआयएम पक्षाला भरभरुन मतदान करावे. आता एकत्र होण्याची गरज आहे. भाजप आणि मोदींना हरवा आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून घालवा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केले. सोमवारी कोल्हापूरमध्ये ओवेसी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ही वेळ मुसलमानांनी सतर्क राहण्याची आहे. मुसलमानांनो तुम्ही तुमची राजकीय लीडरशिप तयार करा, तुम्ही एकत्र व्हा. इम्तियाज जलील यांचे राजकीय नेतृत्व टिकू नये यासाठी शिंदे, शरद पवार, अजित पवार, फडणवीस, ठाकरे सगळे एकत्र झाले. तुम्ही जर सो कॉल्ड पुरोगामी पक्षांना मतदान करत असाल तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकत नाही. मनोज जरांगे पाटील फक्त तीन दिवस उपोषणाला बसले, सरकार त्यांच्या पायाशी आले. त्याप्रमाणे मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे, असे ओवेसी यांनी म्हटले.
आज मला कोल्हापूरमध्ये येऊ देण्यास विरोध करण्यात आला. मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दुधाचे दात अजून पडले नाहीत. मी पाकिस्तानमध्ये जाऊन बोलणारा व्यक्ती आहे. मी तुमच्या बापाशी भांडणारा माणूस आहे. इथे आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला लव लेटर दिले. प्रक्षोभक भाषण करू नका, असे सांगण्यात आले. आम्ही प्रक्षोभक भाषण करत नाही. मात्र, राज्यातील सत्ताधारी नेते रोज महाराष्ट्रात प्रक्षोभक भाषण करत आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करता?, असा सवाल ओवेसी यांनी विचारला.
आय लव मोहम्म चे पोस्टर घेऊन फिरणं सोपं आहे. मात्र त्यांचे विचार तुम्ही आत्मसात करताय का? तुम्ही खरे मुसलमान असाल तर व्यसनापासून दूर राहा, असा सल्ला ओवेसी यांनी तरुणांना दिला. विरोधक तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. पण शहाणे व्हा. या जाळ्यात अडकू नका. या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहायला शिका. मोहम्मदचे पोस्टर रस्त्यावर टाकू नका ते छातीशी कवटाळून ठेवा. मोहम्मद हे फक्त नाव नव्हतं. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये काही घडलं तर त्यावेळी मुख्यमंत्री असलेले बाबा भरभरून बोलले. मात्र, फतेहपुरमध्ये दर्ग्यावर हल्ला झाला त्यावर ते काहीही बोलले नाहीत. हाच यांचा दुटप्पीपणा आहे. लोकांवर जुलूम करणाऱ्यांचे आता काही थोडे दिवसच बाकी आहेत.तुम्ही मोदी, अमित शहा, शिंदे, फडणवीस यांना कोणालाही घाबरू नका. फक्त अल्लाला घाबरा. ही हुकूमत मुसलमानांची विरोधक आहे. भाजपा मुस्लिमांचा इतका तिरस्कार का करतो? मस्जिद आणि दर्गापासून आम्ही मुसलमानांना लांब करतोय असं मोदींना वाटत असेल. मात्र, मोदीजी हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही कायम मशीद आणि दर्ग्यासाठी जगू आणि मरु. सगळ्यांना जीव आहे हे लक्षात ठेवा. आम्ही सगळ्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, असेही ओवेसी यांनी म्हटले.


