अहिल्यानगर -केडगाव परिसरात हातउसनी पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण, शिवीगाळ व दमदाटीची घटना घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिरोज अलीमहंमद शेख (वय 52, रा. भुषणनगर, केडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीन महिन्यांपूर्वी त्यांनी पियुष राजेंद्र बाफना याला तीन लाख रूपये हातउसनी दिले होते.परतफेडीची मागणी वारंवार केली असता बाफना भावंडांशी त्यांचा वाद झाला.मंगळवारी (30 सप्टेंबर) सायंकाळी शिवाजंली लॉनजवळ फिरोज शेख उभे असताना पियुष बाफना व पवन बाफना सहा अनोळखी इसमांसह तेथे आले व शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादींची पत्नी आयशा मध्ये पडली असता तिलाही धक्काबुक्की करून धमकावण्यात आले. परत पैसे मागितले तर जीव घेऊ, अशी धमकी देण्यात आली. झटापटीदरम्यान आयशाच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण गहाळ झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पवन, पियुष, आनंद बाफना व सहा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, याच घटनेबाबत पवन राजेंद्र बाफना (वय 30, रा. भुषणनगर, केडगाव) यांनी विरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या जबाबानुसार, फिरोज शेख याने त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यावरून पवन व त्याचा भाऊ पियुष यांनी शेख याला समजाविण्यासाठी भेट घेतली असता शिवाजंली लॉनजवळ फिरोज शेख, त्याची पत्नी, मुलगा व दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. फिरोज शेख च्या मुलाने लोखंडी रॉडने पवनच्या डोक्यावर वार करून जखमी केले. पवन यांच्या फिर्यादीवरून फिरोज शेख, त्याची पत्नी, मुलगा व दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.
केडगावमध्ये दोन गट भिडले ; कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
- Advertisement -


