अहिल्यानगर -केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा जिल्ह्यात होणारा दौरा सहकाराच्या दृष्टीने तसेच अगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांना उर्जावान ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर दक्षिण भागातील भाजप पदाधिका-यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस आ.मोनीकाताई राजळे, माजी आमदार.नंदकुमार झावरे, वसंतराव कापरे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर अध्यक्ष अनिल मोहीते, आंबादास पिसाळ, बाबासाहेब वाकळे, सभापती काकासाहेब तापकिर, बाळासाहेब गिरमकर, अर्जुन शिरसाठ, धनंजय जाधव, निखील वारे, विनायक देशमुख, सुनिल रामदासी, राहुल शिंदे, दादा सोनमाळी आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे जिल्ह्यात येण्याचा क्षण हा ऐतिहासिक आहे. ऑपरेशन सिंदुर यशस्वी झाल्यानंतर तसेच वस्तु सेवाकर कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय निर्णय करुन, देशातील जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला. यामध्ये त्यांची भूमिका खुप महत्वपूर्ण राहीली. त्यात आपला जिल्हा सहकाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सहकारी संस्थांच्या प्रश्नांसाठी तसेच सहकारी संस्थाच्या विकासासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतलेला पुढाकार हा सहकार चळवळीसाठी दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला भरघोस निधी उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामं मार्गी लागत असल्याची मोठी उपलब्धी आता महायुती सरकारमुळे मिळत आहे. विधानसभा निवडणूकीत या जिल्ह्याने महायुतीला मोठे पाठबळ दिले. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही हा जिल्हा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोणी येथे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. प्रत्येक तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील असे नियोजन करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. आ.मोनिकाताई राजळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वस्तु सेवाकर कमी करण्याचा निर्णय केल्याबद्दल निखिल वारे यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्न यशस्वीपणे सोडविण्याबद्दल मंत्री विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मांडण्यात आला.


