महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक गर्दी करतात. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुण तिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. आता मात्र हीच गौतमी पाटील एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला थेट अटक करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून एका सासीटीव्ही फुटेजची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता गौतमीला अटक केली जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
हे प्रकरण एका अपघाताशी निगडित आहे. 30 सप्टेंबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात एक अपघात झाला होता. हा अपघात एक कार आणि ऑटो रिक्षा यांच्यात झाला होता. या अपघातातील कार ही गौतमी पाटील हिची होती. गौतमीच्या कारने रिक्षाला मागून धडक दिली होती. या दुर्घटनेत रिक्षाचे चांगलेच नुकसान झाले होते. तसेच रिक्षाचलक जखमी झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये बसलेली नव्हती, अशी प्राथमिक माहिती तेव्हा समोर आली होती.
हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईची मागणी केली आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलला अटक करा, अशी मागणी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केली आहे.गौतमी पाटीलला अटक करावी, अशी मागणी करत रिक्षाचालकाचे कुटुंबीय थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, अशी मागणीही कुटुंबियांकडून पोलिसांकडे केली जात आहे. गौतमी पाटीलने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


