एसटी वाहकावर जीवघेणा हल्ला; आरोपींवर तात्काळ कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
 नगर (प्रतिनिधी)– श्रीगोंदा आगारातील एसटी वाहक मानसिंग गोरे यांच्यावर बेलवंडी फाटा ते गव्हाणवाडी दरम्यान अज्ञात इसमांकडून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. “गाडी ओव्हरटेक का केली?” या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीमध्ये गोरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, तपासात पोलीस अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
 वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारी हे तपासामध्ये जाणीवपूर्वक कसूर करत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. तीन आठवड्यांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती, मात्र त्या प्रकरणात आजवर ठोस कारवाई झालेली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 गोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करावी व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ, युवक तालुका महासचिव महेश पवार, रुपेश काळेवाघ, जितेंद्र गायकवाड, सनी कांबळे, मिलिंद शिंदे, विकास ठोंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीगोंदा आगारातील एसटी वाहकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
- Advertisement -


