अहिल्यानगर-घराच्या खरेदी-विक्री व्यवहारात पतीने जास्तीचे पैसे घेतल्याच्या संशयावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना केडगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वैशाली विशाल निमसे (पत्ता माहिती नाही) आणि प्रमोद सुरेकर (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या पतीने दोन महिन्यांपूर्वी वैशाली निमसे हिच्या घराचा व्यवहार करून दिला होता. मात्र, या व्यवहारात फिर्यादीच्या पतीने अधिक पैसे घेतल्याचा संशय वैशालीला होता. यातून ती सतत फिर्यादीच्या पतीला फोन करून पैशांची मागणी करत शिवीगाळ व धमक्या देत होती. बुधवारी (1 ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी घरी एकट्या असताना वैशाली निमसे व प्रमोद सुरेकर त्यांच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
विरोध करताच वैशालीने त्यांना चापटीने मारहाण केली. फिर्यादी घरात गेल्या असता दोघेही त्यांच्यामागे घरात घुसले आणि वैशालीने केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रमोद सुरेकर याने हात धरून ओढत विनयभंग केला व पतीसह जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादी यांनी दुसर्या दिवशी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.


