मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत आरक्षणासाठी हालचालींना वेग आणला आहे. पण मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांकडून विरोध केला जात आहे. यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार निशाणा साधला जात आहे. मनोज जरांगे हे देखील त्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. दोघांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपादरम्यान भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘दारूवाले आणि वाळूवाल्यांनी त्याला मोठे केले आहे.’, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ‘हा जरांगे पाटील कसला पाटील. दारूवाले आणि वाळूवाल्यांनी त्याला मोठे केलं. सासऱ्याच्या घरी तो तुकडे मोडत होता. त्याला पाटील म्हणायचं काय तुम्ही? आता काय त्याच्यापासून अपेक्षा करायच्या. काय चांगल्या बोलण्याची अपेक्षा करायची. एवढे मराठा नेते आहेत. अनेक मंत्री आहेत. सुसंस्कृतपणे बोलतात सर्व समाजांना सोबत घेऊन जाता. मात्र तो तिकडे बावळट कंपनीचा नेता झाला आहे.’
मनोज जरांगे पाटील नेत्यांवर सडकून टीका करतात. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘मनोज जरांगेने दादागिरी केली तिकडे. त्यामुळे लोक त्याला घाबरायला लागले उगीच कारण नसताना. तो चांगला बोलेल अशी जरा देखील अपेक्षा नाही. किती तो किती वेळा घाणेरडा घाणेरडा बोलतो. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तो किती बोलतो. लोकशाहीमध्ये कोणाचा मान सन्मान कसा राखायचा हे त्याला कळत नाही.’
यापूर्वी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुरू असलेल्या उपचारावरून देखील निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, ‘ते सध्या रुग्णालयात आहेत. मग त्यांचे बिल कोण भरते? आमच्याकडे सर्व माहिती आहे.’ तसंच, ‘मनोज जरांगे बकवास बोलत आहे. तो कोणत्या प्रकारचा नेता आहे. त्याला कोणी नेता बनवला?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.


