अहिल्यानगर -भुतकरवाडी परिसरात किरकोळ वादातून दोन इसमांनी एका तरूणाला लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबासाहेब कोरेकर (वय 33, रा. भुतकरवाडी, मराठी शाळेजवळ, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता ते कामावरून घरी परतत असताना त्यांच्या घराजवळ त्यांच्या आई अलका कोरेकर उभ्या होत्या. त्यावेळी शेजारी राहणारा मिठ्या आंधळे हा त्यांच्या आईची चेष्टा करीत होता. यावर प्रकाश कोरेकर यांनी त्याला चेष्टा करू नकोस असे सांगितल्याने मिठ्या तेथून निघून गेला. थोड्याच वेळात मिठ्याचे वडील पिंट्या बाळासाहेब आंधळे आणि त्याचा भाऊ बालू बाळासाहेब आंधळे हे दोघे घटनास्थळी आले.
त्यांनी प्रकाश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. पोलिसांनी पिंट्या बाळासाहेब आंधळे आणि बालू बाळासाहेब आंधळे (दोघे, रा. भुतकरवाडी, मराठी शाळेजवळ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


