अहिल्यानगरमध्ये ओवेसींची उद्या गुरुवारी सभा होणार आहे. ओवेसींच्या या सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 29 तारखेला घडलेल्या दगडफेक आणि पोलीस लाठीचार्जनंतर ओवेसी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अहिल्यानगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदउद्दीन ओवेसी यांची सभा उद्या गुरुवारी अहिल्यानगरमध्ये होणार आहे. याआधी 29 सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर 30 सप्टेंबरची नियोजित सभा रद्द करण्यात आली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एकदा ओवेसींची सभा होतेय.
या सभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते AIMIM मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानंतर आणि पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकांना अटक झाल्यामुळे शहरात एकप्रकारे तणावपूर्ण शांततेचं वातावरण निर्माण झालं होते.
या पार्श्वभूमीवर ओवेसी उद्या काय बोलतात, ते या घटनेवर आणि मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करताना काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंतर ओवेसी हे प्रक्षोभक भाषण करत असल्याने नगर शहरात वातावरण खराब होणार अशी चर्चा होत आहे. यावर असदुद्दीन ओवैसी हे संविधानाच्या चौकटीत राहून बोलणारे व्यक्तिमत्व असून मतांच्या ध्रुवीकरणासाठी त्यांना बदनाम करण्यात येतं असल्याची भूमिका जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी व्यक्त केली आहे.


