छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. सोमवारी (दि. 13) सकाळी इमामपूर घाटात झालेल्या अपघातात धनगरवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रहार संघटना व धनगरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. मृत शेतकऱ्याचा मृतदेह महामार्गावर ठेवून आंदोलन करण्यात आले. तसेच महामार्गाच्या कामाचा प्रश्न मार्गी न लागल्यास दशक्रिया विधी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात करण्याचा इशारा या वेळी देण्यात आलाइमामपूर घाटातील हॉटेल निसर्गजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात धनगरवाडी येथील शेतकरी हनुमंत शिकारे यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूला महामार्गावरील खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गालगतच्या गावांतील रहिवासी, तसेच विविध सामाजिक संघटना दुरुस्तीची मागणी करत आहेत. त्यासाठी आंदोलने, गांधीगिरी करण्यात आली होती. परंतु प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या महामार्गाची दुरवस्था झाली असतानाही मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गाने वळविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच अपघात वाढल्याने प्रहार संघटना व धनगरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
शेतकऱ्याचा मृतदेह महामार्गावरच ठेवून सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष मालोजी शिकारे, किशोर शिकारे, रमेश भोजने, संदीप कापडे, सोपानराव शिकारे, विष्णू आढाव, बाळासाहेब शिकारे, रमेश गवळी, सखाराम गवळी, इंद्रभान शिकारे यांच्यासह प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व धनगरवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारंवार मागणी, निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून महामार्गाच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेण्यात येत नाही. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेक निष्पापांचे बळी गेलेले आहेत व जात आहेत. अपघातात बळी गेलेल्यांचे संसार उघड्यावर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
किशोर शिकारे


