Thursday, October 30, 2025

कर्जत – जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

कर्जत – जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती, प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

अहिल्यानगर –

महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत – जामखेड मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ५ शाळा खोल्यांसाठी ६० लाखांचा निधी तर जामखेड तालुक्यातील ३ शाळा खोल्यांसाठी ३६ लाखांचा असा एकूण ८ नवीन शाळा खोली बांधकामांसाठी तब्बल ९६ लाख रुपयांचा भरीव निधी कर्जत – जामखेड मतदार संघासाठी मंजूर झाला असल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची कार्यालयाने दिली.

कर्जत तालुक्यातील मंजूर कामांमध्ये मौजे गणेशवाडी (माळवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख, मौजे गुरवपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत एक वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख, मौजे खातगाव येथे एक वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख, मौजे बाभुळगाव खालसा येथे एक वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख आणि मौजे दिघी येथे एक वर्गखोली बांधकामासाठी १२ लाख असा एकूण ६० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्यातील कामांमध्ये मौजे बांधखडक (वनवेवस्ती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी एक नवीन शाळा खोली बांधकामासाठी १२ लाख आणि मौजे जामखेड (महादेव गल्ली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी दोन नवीन शाळा खोली बांधकामासाठी २४ लाख असा एकूण ३६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या सर्व कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, संबंधित विभागांमार्फत तांत्रिक मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया होऊन बांधकामाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा ज्या जुन्या किंवा जीर्ण अवस्थेत होत्या तसेच वर्गखोलीअभावी अडचणीत होत्या, त्यांना या मंजुरीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले की, “शिक्षण हा विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, हेच माझे प्राधान्य आहे. एक चांगली शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, तर समाजाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, प्रेरणादायी आणि आदर्श शैक्षणिक वातावरण मिळाले पाहिजे. हाच माझा प्रमुख उद्देश आहे”

या निधीच्या मंजुरीबद्दल सभापती प्रा.राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

या निधीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, आधुनिक आणि प्रशस्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील शैक्षणिक अधोसंरचनेला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक व पालक वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून सर्वांनी प्रा.राम शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles