राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची शुक्रवारी “काळी दिवाळी”
खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्षाचा निर्धार
अहिल्यानगर : प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टी, पिकांची झालेली नासाडी आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या फसव्या मदतीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)ने “काळी दिवाळी” साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी सांगितले की, राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने केवळ पंचनाम्यांच्या आणि फोटोसेशनच्या गोंधळात वेळ घालवून मदतीसाठी जुने निकष लावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष काहीही दिलासा मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. तथापि, या मोर्च्यानंतरही सरकारने “फसवी मदत” जाहीर करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केल्याचे खा. लंके म्हणाले.
खा. लंके पुढे म्हणाले, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत
या दोन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती अशी आठवण खा. लंके यांनी करून दिली.
सरकारने नुकतेच ३६ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी ते “फसवे” आहे. विविध निकषांच्या भूलथापांमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही, असा आरोप करत या “फसव्या मदतीचा” निषेधच “काळी दिवाळी” म्हणून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना सरकार फक्त घोषणांची फटाकेबाजी करत आहे. ही खरी दिवाळी नाही, ही बळीराजाच्या वेदनेची ‘काळी दिवाळी’ आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत आणि सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत राष्ट्रवादीचा संघर्ष सुरूच राहील.”
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य


