नगर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी, दहशतीच्या घटना वाढत चालल्या आहेत. भरदिवसा ग्रामस्थांसमोर एका तरुणाचे जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याची घटना हातवळण गावामध्ये शनिवार (दि.25) रोजी दुपारी घडली. यावेळी तरुणाच्या कुटुंबीयांना मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. आरोपींची दहशत एवढी होती की ग्रामस्थांसमक्ष दुकानाची तोडफोड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना देखील करण्यात आली. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेहातवळण गावात घडलेल्या अपहरणाच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. भरदिवसा ग्रामस्थांसमक्ष अपहरण, कुटुंबीयांना शिवीगाळ, मारहाण, दुकानाची तोडफोड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याची हिम्मत येतेच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप नागरिकांमधून होत आहे. अशी दहशत पसरवणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होत आहे. घटनेबाबत हातवळण ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन समोर गर्दी केली होती.
रविवार (दि. 26) रोजी रात्री घटनेबाबत विवाहित महिलेने तालुका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गणेश काकडे, माऊली पठारे (पूर्ण नाव माहीत नाही), सुनील दिलीप पठारे, अक्षय भंडारी (सर्व रा. बनपिंप्री) हे चौघेजण हातवळण गावातील घरी आले. त्यांनी विचारले तुझा नवरा कोठे आहे. त्याने माझ्याकडून घेतलेले पैसे अजून दिले नाही. त्यावेळी त्यांना सर्व पैसे दिले असल्याचे सांगितल्याने राग आला. त्यांनी सर्वांनी शिवीगाळ करून एकाने हाताला धरून बाहेर ओढले. तसेच नवरा व सासरा यांचे हातपाय काढण्याची धमकी दिली.
त्यानंतर हातवळण गावातील चौकामध्ये असणाऱ्या सलूनच्या दुकानात पतीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दुकानातील खुर्च्या, आरसा, फॅन, फर्निचर, सलूनसाठी लागणाऱ्या मशिनरी तसेच इतर साहित्याची तोडफोड करून काही साहित्य बाहेर फेकून दिले. हातवळण ग्रामस्थांच्या समक्ष दुकानातील महापुरुषाच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली. फिर्यादीमध्ये 18 ग्रामस्थांची नावे देण्यात आली असून त्यांच्या समक्ष दुकानाची तोडफोड व मूर्तीची विटंबना झाल्याचे ही नमूद करण्यात आले आहे. तसेच पती यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वरील चौघांनी पळवून नेले असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर महामार्गावरील अनेक हॉटेल, लॉज वेश्याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध झाली आहेत. येथील वेश्या व्यवसायामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे नगर व श्रीगोंदा हद्दीतील वेश्याव्यवसाय तात्काळ बंद करण्याची देखील मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा परिसरातील ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.


