अहिल्यानगर-मागील दोन वर्षांची किराणा मालाची उधारी मागितल्याच्या रागातून एका व्यावसायिकाला १ लाख ७० हजार रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास दुकान फोडून कुटुंबासह उचलून नेण्याची आणि सर्वांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी किराणा व्यावसायिक चेतन विजय गुगळे (वय ३७, रा. कामरगाव, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. तुषार सावत्या भोसले, सावत्या अकल्या भोसले, प्रिती तुषार भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौडा, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी चेतन गुगळे यांचे कामरगाव शिवारात किराणा दुकान आहे. सोमवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी हे त्यांच्या दुकानावर आले. त्यांनी गुगळे यांच्याकडे किराणा मालाची मागणी केली.
त्यावेळी गुगळे यांनी आरोपींना, तुमची मागील दोन वर्षांची उधारी बाकी आहे, ती आधी द्या, मग मी तुम्हाला किराणा देतो, असे सांगितले. याचा राग आल्याने तुषार भोसले व सावत्या भोसले यांनी गुगळे यांच्याशी वाद घातला. आमच्याकडे तुझी कोणतीच उधारी नाही. आम्ही पारधी आहोत, आम्ही तुझ्यावर खोटी केस करू. तूच आम्हाला १ लाख ७० हजार रूपये दे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावरच ते थांबले नाहीत, तर पैसे दिले नाहीतर तुझे दुकान रात्री फोडून टाकू आणि तुला व तुझ्या कुटुंबाला रात्रीतून उचलून नेऊन सगळ्यांना जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. तसेच, प्रिती भोसले हिने यापूर्वी अशाच प्रकारे किराणा मागितला असता, उधारीचे पैसे मागितल्यावर उलट फिर्यादीकडेच पैशाची मागणी करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


