अहिल्यानगर-पुण्यावरून आलेल्या व्यक्तीला अहिल्यानगर शहरातील स्वास्तिक चौक परिसरात दमदाटी करून चाकूचा धाक दाखवत लूट करणार्या तिघा आरोपींना येथील दिवाणी न्यायाधीश प्रतिभा ए. पाटील यांनी सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 10 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
नवाज रऊफ सय्यद (वय 31), ऋषभ प्रकाश क्षेत्रे (वय 18), परवेज मेहमूद सय्यद (सर्व रा. अहिल्यानगर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.25 ऑगस्ट 2020 रोजी रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी कामानिमित्त पुण्याहून नगर येथे आले होते. ते पुणे बसस्थानकाजवळील स्वास्तिक चौकात रिक्षाची वाट पाहत असताना, वरील आरोपी मोपेडवर येऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी करू लागले. फिर्यादीने नकार दिल्यावर, आरोपी नवाज सय्यद याने त्यांच्या गळ्याला चाकू लावला, तर इतर दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीकडून तीन हजार रूपये रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य बळजबरीने काढून घेतले आणि पळून गेले.यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादीची साक्ष, पंच व तपास अधिकार्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. भाग्यश्री शंकरराव कुंजर- नेमाणे यांनी खटल्यात प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने सादर पुरावे, साक्षी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहा. फौजदार एस. के. सोनवणे, पोलीस अंमलदार सचिन डमाळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.


