नांदेड जिल्ह्यातील नायगाव घरकुल लाच प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती नायगाव येथे 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट कार्यमुक्त करण्यात आलं आहे. येथील भाजपा आमदार राजेश पवार यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती, नागरिकांना घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, आमदारांच्या (MLA) अचानक भेटीतही हे उघड झालं होतं. लाच (Bribe) घेतल्याचं काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी मान्य केलं होतं. त्यानुसार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार करणाऱ्यांचे, लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नायगाव पंचायत समितीमध्ये गोरगरिबांच्या घरासाठी पैसे मागणाऱ्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नांदेड मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे. त्यानुसार, उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यांत येते की, 27 ऑक्टोबर रोजी 89-नायगांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार, यांनी पंचायत समिती, नायगांव कार्यालयास भेट दिली. त्यावेळी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा एन्टी ऑपरेटर व इतर अधिकारी घरकुल लाभार्थ्यांचे देयके काढण्यासाठी पैसे घेतात व जाणून बुजून तांत्रिक अडचण दर्शवून विलंब करतात, अशी कबुली देऊन स्वतः मान्य केल्याची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांच्या स्वरुपात व्हायरल झालेली आहे. या व्हायरल व्हिडिओ क्लिपची दखल घेत पंचायत समितीमधील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
89-नायगांव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांच्या समोर आपण असे स्पष्ट केलेले आहे की, घरकुल लाभार्थ्याकडून आपण लाच घेता, हे व्हिडीओ क्लिपमध्ये स्पष्टपणे मान्य केलेले आहे. त्यामुळे आपणास ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. कार्यमुक्तीची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये अर्जुन प्रभाकरराव जाधव, शेख समिर, ओमप्रकाश विश्वनाथ पांडागळे, सुजित शिवराम दाताळकर, धोंडीबा मारोती उपासे, आडे संतोष किशन, ऋषिकेश नामदेव सरादे, मोहम्मद इब्राहिम, संतोष माधवराव वडजेंसह नायगांव पं.समितीमधील सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, यांचा समावेश आहे.


