अहिल्यानगर-शहराच्या स्वच्छतेबाबत आ. संग्राम जगताप यांनी महानगरपालिका बैठकीत सर्व स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेतली तसेच आयुक्त यशवंत डांगे यांनाही धारेवर धरत जाब विचारला. जबाबदारीने काम न करणार्या स्वच्छता निरीक्षकांना आठ दिवसांची बिनपगारी सुट्टी देण्याचे आदेश आ. जगताप यांनी आयुक्तांना दिले. तसेच निरीक्षकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर मी स्वतः त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करीन, असा इशाराही त्यांनी दिला.महानगरपालिकेमध्ये आयुक्त डांगे यांच्या दालनात गुरूवारी (30 ऑक्टोबर) बैठक झाली. यावेळी आ. जगताप म्हणाले, शहरात कचरा संकलनाचे नव्याने काम सुरू झाले असून, सुमारे 80 कचरा गाड्या कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. कचरा फक्त कचरा गाडीतच टाकून शहर स्वच्छ ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे. शहर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता आपल्या मातृभूमीला स्वच्छ व सुंदर ठेवावे. जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतील, त्यांच्यावर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता निरीक्षक जबाबदारीने काम करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आयुक्त डांगे म्हणाले, नगर शहरात स्वच्छता राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी नव्याने कचरा संकलनाची एजन्सी नेमण्यात आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी रोज सकाळी स्वच्छता करत असतात. मात्र स्वच्छता झाल्यावर नागरिक पुन्हा रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशांवर आता मनपाचे कर्मचारी नजर ठेवणार असल्याचे सांगितले.


