अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावरील गणेशनगर भागात हॉटेल व्यावसायिकावर एका ग्राहकाने बिल मागितल्याचा राग आल्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (2 नोव्हेंबर) रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली. शोभराज मुरलीधर वांढेकर (वय 27, रा. मोहज, ता. पाथर्डी) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्ता सोनवणे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कल्याण रस्त्यावर हॉटेल भावकी या नावाने मागील वर्षीपासून हॉटेल व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या हॉटेलवर नियमितपणे जेवणासाठी येणारा दत्ता सोनवणे हा नेहमी बिल देताना वाद घालून उशीर करत असे तसेच काही उधारीचे पैसे बाकी होते.
रविवारी रात्री 8.45 वाजता दत्ता हा त्याच्या दोन मित्रांसह हॉटेलवर आला होता. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला सांगितले की, तुम्ही वारंवार बिल न देता वाद घालता, माझ्या हॉटेलवर जेवण करू नका, असे म्हणताच दत्ता संतापला व शिवीगाळ करत वाद घातला. त्याने आपल्या कारमधील लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यात प्रहार केला. यात फिर्यादी जखमी झाले. जखमी अवस्थेत फिर्यादीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दत्ता सोनवणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


