राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा लागली असून, आजच या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेतच नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची चिन्हे आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून याच परिषदेत ते निवडणुकीच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार आहेत.
पहिला टप्पा: राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका.
दुसरा टप्पा: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका.
तिसरा आणि अंतिम टप्पा: महानगरपालिका निवडणुका.
पहिल्या टप्प्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, आणि 21 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी मतदार घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी दाद मागितली होती. निवडणूक आयोगांची भेट देखील घेतली होती. मतदार यादीच्या घोळाबाबत मनसे आणि महाविकास आघाडीने संयुक्त सत्याचा मोर्चा देखील काढला होता. मतदार यादीत घोळ आहेत. याचे पुरावे देखील समोर ठेवले होते. मात्र आता आज आयोगाने निवडणुकीची घोषणा केली तर विरोधक काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


