गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात येणाऱ्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली .या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत . पावसाचा जोर ओसरला असला तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
यंदा पावसाचा मुक्काम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला आहे . आधी नैऋत्य मौसमी पावसाची परतीची वेळ टळली . परतीच्या पावसाचा वाढलेला कालावधीनंतर झालेली अतिवृष्टी, बंगालच्या उपसागरात तयार झालेला मोंथा चक्रीवादळ, आणि आता अवकाळी पाऊस कोसळत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत .सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभरात अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे . परिणामी महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय .हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस तळ कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता आहे .
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार राज्यभरात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र त्यानंतर हळूहळू तापमान वाढेल . किमान तापमानात पुढील 48 तास कोणताही बदल राहणार नाही मात्र त्यानंतर दोन ते तीन अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता आहे . पुढील चार दिवस विदर्भातील तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे .
4 नोव्हेंबर : आज कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला नसला तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र व तळ कोकणात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5 नोव्हेंबर : रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .सिंधुदुर्ग रायगड व मराठवाड्यातील धाराशिव लातूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे .
6 नोव्हेंबर : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय . मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नगर, नाशिक, जळगाव ,धाराशिव, लातूर ,नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली .
7 नोव्हेंबर : सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात यलो अलर्ट . मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता


