अहिल्यानगर-नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश काढून जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकारी दिले आहेत. अहिल्यानगर शहरातील तोफखाना, संगमनेर शहर, पारनेर, जामखेड, राजुर व बेलवंडी पोलीस ठाण्याला नवीन कारभारी मिळाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या करण्यात आल्याने जिल्हा पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची बदली ए. एच. टी. यु. अहिल्यानगर येथे करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपअधीक्षक (गृह) पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्या जागी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची बदली करण्यात आली आहे, तर पारनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी जिल्हा विशेष शाखेचे संतोष खेडकर यांची बदली करण्यात आली आहे.
जामखेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना राजुर पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले असून राजुर पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक सरोदे यांची बदली पारनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तीन पोलीस निरीक्षकांच्या मध्यावधी बदल्या केल्या आहेत. यामध्ये तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची बदली मानवसंसाधनच्या प्रभारीपदी करण्यात आली असून नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी संतोष भंडारे यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे.


