दीड वर्षापासून रखडलेल्या एकविरा चौक ते पारिजात चौक ते बी.एस.एन.एल. ऑफिस समतानगर रस्ता तात्काळ पूर्ण करावा – नगरसेवक योगिराज गाडे
अहिल्यानगर :
सावेडी उपनगरातील एकविरा चौक ते पारिजात चौक तसेच पारिजात चौक ते बी.एस.एन.एल. ऑफिस मार्गे समतानगरपर्यंतच्या रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून रखडलेले असून, आजतागायत पूर्ण झालेले नाही. या कामाचा वेग अत्यंत संथ असून, नागरिकांना व व्यापाऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची पाहणी नगरसेवक योगीराज गाडे व नागरिकांनी आज केली.
रस्त्यावर सर्वत्र खड्डे, दगड व धुळीचे साम्राज्य आहे. वाहनधारक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास होत आहे. वाहतुकीसाठी हा मार्ग अडथळ्यांचा बनला असून, नागरिकांना पर्यायी मार्गाने मोठा वळसा घ्यावा लागत आहे. परिणामी वेळ, इंधन आणि व्यवसाय — तिन्हींचे नुकसान होत आहे.
महानगरपालिका सध्या प्रशासकांच्या ताब्यात असून, नागरिकांच्या कराच्या पैशातून सुरू असलेले हे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेला त्रास लक्षात घेऊन हे रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी ठाम मागणी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी केली.


