समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट किर्तनं आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदुरीकर महाराज यांची किर्तनं नेहमीच लोकांना विचार करायला लावतात. नुकतंच त्यांच्या घरात एक आनंदाचं वातावरण होतं. कारण त्यांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला. हा सोहळा संगमनेरमध्ये अत्यंत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता. सजावट, पोशाख आणि वातावरण यामुळे या साखरपुड्याला राजेशाही थाट लाभला. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला असून, अनेकांनी “इंदुरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा सोहळा” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. महाराज नेहमी आपल्या किर्तनातून साधेपणाचं महत्त्व सांगतात, पण या वेळी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात.
माहितीनुसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे.इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.


