दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांकडून लेकीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी;
आपल्या नर्मविनोदी आणि थेट शैलीतून समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, यावरून समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका केली आहे. “दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात, असे तळेकर यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले.तळेकर पुढे म्हणाले, “इंदुरीकर महाराज कीर्तनातून लोकांना नेहमी सांगतात की मुलांची लग्नं व साखरपुडे साध्या पद्धतीने करा, कर्ज काढू नका, अनाठायी खर्च टाळा. पण त्यांनी स्वतःच जर अशा थाटामाटात साखरपुडा केला, तर ते समाजासमोर चुकीचा संदेश देणारे आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीप्रमाणे वागले असते, तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता.”
जर साखरपुड्यातच एवढा खर्च झाला असेल, तर लग्नसमारंभात नक्कीच करोडो रुपयांची उधळपट्टी होईल. समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करत नाही, याचा खेद वारकरी सांप्रदायाला आहे. निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर सांप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता, असेही सुभाष तळेकर म्हणाले.


