संगमनेर-शेतकर्यांच्या नावे ट्रॅक्टर घेवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅक्टर पळवणार्या टोळीतील दोन आरोपींना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अटक करत 9 ट्रॅक्टरसह 2 मोटारसायकल असा एकूण 71 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की आरोपी भालचंद्र अशोक साळवी (रा.वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना तुम्हांला ट्रॅक्टर घेण्यास मदत करतो असे सांगून नवीन ट्रॅक्टरचे डाऊन पेमेंट एक लाख रुपये रुपये मी भरुन ट्रॅक्टर तुमच्या नावावर घेवून देतो, ट्रॅक्टर आल्यनंतर तुम्हांला वाटल्यास ट्रॅक्टर माझ्याकडे कामाला लावा, त्या मोबदल्यात 80 हजार रुपये देतो. तसेच पुढचा सहा महिन्यांचा हप्ता देखील भरतो आणि सहा महिन्यासाठी ट्रॅक्टर वापरण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपये महिना देतो असे आमिष दाखवले.
यावरुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेवून त्यांना एल अँड टी कंपनीचे फायनान्स कंपनीचे कर्ज करुन 4 जून, 2025 रोजी ट्रॅक्टर श्री. महाकाली शोरुम श्रीरामपूर येथून घेवून दिले होते. सदरचे ट्रॅक्टर 6 जून, 2025 रोजी आरोपी यांनी फिर्यादीची फसवणूक करुन स्वतःकडे घेवून गेले व ठरल्याप्रमाणे 80 हजार रुपये फिर्यादीस दिले नाहीत. त्यानंतर फिर्यादीचे फोन उचलणे बंद केले. त्यावेळी फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी राजूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला.
या गुन्ह्याची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणावरुन सदर आरोपी हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार राज्य येथे नेहमी ये-जा करत असल्याचे समजले. त्यावर पाळत ठेवली असता तो 4 नोव्हेंबर, 2025 रोजी अहिल्यानगर येथे आल्याची समजल्याने भालचंद्र अशोक साळवी व अभिजीत सुनील भांडवलकर (वय 32, रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचे ट्रॅक्टर हे करण रजपूत (सिल्लोड, जि. संभाजीनगर) यांना चार लाख रुपये किंमतीला विकल्याचे सांगितले. आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी याप्रमाणेच इतर शेतकर्यांची फसवणूक केली करत 9 ट्रॅक्टर व 2 मोटारसायकल विकल्याचे उघड झाले.
सदर 9 ट्रॅक्टरपैकी 1 शिर्डी, 3 अहिल्यागनर, 2 श्रीगोंदा, 2 नारायणगाव (ता. जुन्नर, जि. पुणे), 1 सिन्नर (जि. नाशिक) तसेच मोटारसायकलींपैकी 1 श्रीगोंदा व 1 नारायणगाव याठिकाणी वेगवेगळे पथके पाठवून दिलीप राजाराम कोते (रा. निघोज, शिर्डी), शुभम राजू दळवी (रा. सोनेवाडी, अहिल्यानगर), भैरवनाथ मच्छिंद्र आल्याडे (रा. पाळेवाडी, धामोरी, आष्टी), सुनील गोंडाळ (रा. चास, अहिल्यानगर), शैलेश पोपट चौरे (रा. टाकळी, कडेवाडी, श्रीगोंदा), संतोष झावरे (रा. वांगदरी, श्रीगोंदा), विशाल धोंडिबा पानसरे (रा. रा. इंदोरी, मावळ), अमित अशोक गायकवाड (रा. माळकुप, भाळवणी), मंगेश रमेश सानप (रा. निमगाव, सिन्नर) या नऊजणांकडून ट्रॅक्टर आणि अश्विन सुनील वाबळे (रा. सोनगाव, राहाता) व शैलेश पोपट चौरे या दोघांकडून दुचाकी असा एकूण 71 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत भालचंद्र साळवी व अभिजीत भांडवलकर यांना अटक करण्यात आली.


