राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सरकारी नियमांना पायदळी तुडवत पार्थ पवारांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पार्थ पवार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड, आयजीआर यांच्याकडून माहिती मागवली आहे. यासंदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश मी दिले आहेत. यासंदर्भातील माहिती आणि प्राथमिक चौकशी याच्या आधारावर यासंदर्भात मी माहिती देईल. अद्याप याबाबत सर्व माहिती आली नाही. पण जे मुद्दे समोर येतात ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्याची योग्यप्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्या दृष्टीने ही सर्व माहिती आज माझ्याकडे येईल. ही माहिती आल्यानंतर यासंदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे आणि याच्यामध्ये काय कारवाई करण्यात येणार यासर्व गोष्टी सांगण्यात येतील.
मुख्यमंत्र्यांनी पुढे असे देखील सांगितले की, ‘उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घातलील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कुठेही अनियमितता असेल तर ते पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर कडक कारवाई होईल.’
पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त ३०० कोटी रुपयांनी खरेदी केली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तर जागेचे मूळ मालक सांगतायत, ही जागा महार वतनाची आहे त्यानंतर ही जागा सरकारने घेतली. आमचे पूर्वज अशिक्षित असल्यामुळे शितल तेजवानी नावाच्या महिलेने जागेचा ताबा मिळवून देते सांगून सगळ्यांकडून पावर ऑफ पॅटर्न करून घेतली.
शितल तेजवानी या महिलेने ही जागा अमीडीया कंपनीला दिली. या जागेच्या सातबारावर अद्याप आमची नावे आहेत. आमची जमीन आम्हाला मिळावी. अशी मागणी मूळ मालकांनी केली आहे. त्यामुळे या जमीन व्यवहार प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही किंवा घोटाळा केला नाही अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दला आहे.


