मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे. मनोज जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या. मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलिस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे समोर आली आहेत. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे. काही कोटींची ऑफर देऊन हा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. ऑफर देणारा बडा नेता परळीचा असलयाचे सांगितले जात आहे.


