राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. स्व. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर प्रथमच हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शोकाकुल वातावरण असूनही कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाने कार्य सुरू करण्याचा दृढ निर्धार दिसून आला.
याप्रसंगी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करताना, स्व. शिवाजीराव कर्डीले यांनी राहुरी तालुक्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी आणि त्यांचा अपूर्ण राहिलेला विकास साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
तसेच, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचा शतप्रतिशत विजय सुनिश्चित करण्यासाठी एकजुटीने, संघटितपणे आणि जनतेच्या विश्वासावर काम करण्याचे आवाहन केले. यावेळी कर्डिले साहेबांवर प्रेम करणारा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
राजकारणात धोबीपछाड कसे करायचे हे स्व. शिवाजीराव कर्डीले यांना चांगले ठाऊक होते, आणि ते गुण त्यांनी निश्चित अक्षयलाही दिले असतील, आता सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करत सत्ता मिळवावी, हीच खरी श्रद्धांजली स्व.शिवाजीराव कर्डीले यांना ठरेल, असे प्रतिपादन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ .सुजय विखे पाटील म्हणाले, “स्व. कर्डीले हे माझे मार्गदर्शक मित्र व जिल्ह्यातील राजकारणातील वस्ताद होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अक्षय कर्डीले ही जबाबदारी समर्थपणे पेलतील, आणि राहुरी नगरपरिषदेत महायुतीचा झेंडा फडकवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
आ. संग्राम जगताप यांनी सांगितले की, “स्व. कर्डीले हे कामाचा झपाटा लावणारे, प्रामाणिक आणि जनतेशी घट्ट नाते राखणारे नेते होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व पोटनिवडणुकीत सर्वांनी अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी उभे राहावे.”
सत्यजित कदम यांनीही स्व.कर्डीले यांना आपले मार्गदर्शक संबोधत, “अक्षय कर्डीले यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत” असे मत व्यक्त केले.
प्रसंगी अमोल भनगडे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, धनंजय आढाव, राजेंद्र उंडे, विराज धसाळ, नयन शिंगी, रवींद्र म्हसे, अण्णासाहेब शेटे, सर्जेराव घाडगे, रावसाहेब तनपुरे, गणेश खैरे, नारायण धोंगडे, सुजय काळे, तसेच तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.


