पुण्यामधील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना गोखले बिल्डरच्या साथीत जैन बोर्डींग जमीन खरेदी करण्याचा डाव अंगलट आलेला असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यामध्येच जमिनी खरेदीवरून गंभीर आरोप झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज (6 नोव्हेंबर) थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्कमधील महार वतनाची जमीन तब्बल 1800 कोटींची असताना फक्त 300 कोटींमध्ये हडप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या व्यवहारासाठी अवघी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.अंबादास दानवे यांनी आज ट्विट करत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना चांगलंच घेरलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्यांचा दाखला देत अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं. मग तुम्हाला जमीन का फुकट लागते? असा बोचरा सवाल अजित पवारांना केला आहे. 1800 कोटींची जमीन असताना ती 300 कोटींमध्ये तुम्हाला का लागते? अशी विचारणा त्यांनी केली. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या, हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!
अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात काय परिस्थिती आहे? देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेत आहेत. अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये देतात. अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला जमीन फुकट का लागते? अशी जमीन घेताच येत नाही. भूसंपादन झालेली जमीन परत कशी मिळते? महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळते? कोणता नियम पार्थ पवार यांनी पाळला, सर्व खुलासा पार्थ पवार यांनी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली. दादा महिनाभर मंत्रालयातील फाईल पुढे सरकत नाही. दोन दिवसात पार्थ पवारांची फाइल कशी सरकली? राज्याला लुटण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. अजित पवार यांचा राजकीय वापर केला असेल, ते नाकाने कांदे सोलतात त्यांनी याचे उत्तर द्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला.


