नागपुरात भाजप नेत्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याची हत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर नागपुरातील भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सचिन साहू असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे.
सचिन साहू हे उत्तर नागपुरातील वॉर्डाचे अध्यक्ष होते. जुन्या पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सचिन यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले. वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. सचिन यांचे मारेकरी नेमके कोण होते? त्यांच्या हत्येचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहे. या हत्येमागे तीन ते चार जण असल्याचा पोलिसांना संशय आहे. सचिन यांचा गणेशोत्सवादरम्यान काही लोकांशी वाद झाला होता. सचिन यांच्या हत्येमागे त्यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.


