अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील मुरूम उत्खनन बंद करा. तसेच शस्त्र परवाने रद्द करा या मागणीसाठी उंबरे येथील एका इसमाने राहुरी तहसिलदार यांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केल्याने तहसील परिसरात गोंधळ उडाला होता. संबंधित इसमाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रार अर्जात म्हटले की, उंबरे येथील भाऊसाहेब दशरथ काळे यांनी काही दिवसांपूर्वी उंबरे परिसरातील मुरूम उत्खनन बंद करावे, तसेच शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी दि.21 एप्रिल रोजी उपोषणाचा तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र काल दुपारच्या सुमारास राहुरी तहसिलदार यांच्या दालनात येऊन आरडाओरड करून स्वत:जवळील पेट्रोल असलेल्या बाटलीतून अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब काळे यांना पोलिसांच्या हवाली केले. मात्र या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
काल राहुरी तहसील कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेणार्य इसमाला गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी उंबरे येथील एका शस्त्र परवानाधारकाने शास्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती अशी चर्चा आहे. या शस्त्र परवानाधारकाची राहुरीसह जिल्ह्यातील काही पोलिसांचे ऊठबस असल्यामुळे या इसमावर कुठलीही कारवाई पोलीस करत नाही. या शस्त्र धारकाकडे अनेक पोलीस अधिकारी जेवणाच्या पार्टीसाठी येतात व तेच फोटो व्हायरल करून दहशत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा उंबरेचे सुद्धा बीड झाल्याशिवाय राहणार नाही अशी सध्या या परिसरात चर्चा सुरू आहे


