Saturday, February 21, 2026

माजी सभागृह नेते अशोक बडे यांची महापालिका निवडणुकीतून माघार

बाबुशेठ नागरगोजे यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय

माजी सभागृह नेते अशोक बडे यांची महापालिका निवडणुकीतून माघार

अहिल्यानगर : प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योजक बाबुशेठ नागरगोजे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेनेबाबत कोणतीही नाराजी नसून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे बैठकीत सांगितले गेले. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्याशी असलेल्या कौटुंबिक स्नेह संबंधांचा उल्लेख करत नागरगोजे यांनी आगामी काळात प्रभागाच्या सर्व प्रश्नांवर ठामपणे काम करण्याची भूमिका जाहीर केली. या बैठकीत उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बबन कातोरे, भाऊसाहेब भोर, लहानू भोर, नवनाथ कातोरे, बाळू वाकळे, पंकज वाकळे, बहिरू वाकळे, अनिल नागरगोजे, भाऊसाहेब खेडकर, चैतन्य बडे, बाळासाहेब बडे, केशव नागरगोजे, सुनील खामनेकर, आप्पासाहेब कातोरे यांसह बोल्हेगाव–नागापूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले की, प्रभागातील विकासाच्या प्रश्नांवर सर्वजण एकत्र आले असून माजी सभागृह नेते अशोक बडे यांनीही प्रभागात उत्तम कामे केली आहेत. आता मित्र परिवारामध्ये कोणतीही अडचण शिल्लक नसून येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) या चिन्हावर विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशोक बडे यांनी सांगितले की, गेली २० वर्षे प्रभागात सतत सेवा करताना नागरगोजे–बडे कुटुंबाने सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेतल्याने नागरिकांशी घट्ट नाते तयार झाले. आता प्रभागातील सर्वजण एकत्र आल्याने विकासाला नवी दिशा मिळेल. कुमारसिंह वाकळे यांचेही प्रभागातील काम उल्लेखनीय राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
बाबुशेठ नागरगोजे यांनी सांगितले की, बोल्हेगाव-नागापूर परिसराचा झपाट्याने विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक प्रश्नांना समाधानकारक तोडगा काढता येईल, यावर पूर्ण विश्वास असल्याने लवकरच अधिकृतरीत्या प्रवेश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब खेडकर यांनी केले तर चैतन्य बडे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles