Tuesday, March 3, 2026

अहिल्यानगर शहरातील धक्कादायक घटना महिलेची घरात घुसून हत्या

अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात एका अपंग महिलेची अज्ञात व्यक्तीने घरात घुसून क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारदार शस्त्राने गळा व हनुवटीवर गंभीर वार करून महिलेला संपविण्यात आले असून, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.​बोल्हेगाव येथील शनी मंदिरा जवळील कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड परिसरात तक्रारदार (फिर्यादी) हे आपली पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. त्यांचे एमआयडीसीमध्ये वर्कशॉप असून, घटनेच्या दिवशी फिर्यादी व त्यांचा मुलगा नाशिक जिल्ह्यातील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची पत्नी उंचीने बुटटी असून, दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे त्या सहसा घराबाहेर जात नसत.

​सकाळी चहा पिऊन फिर्यादी पिता-पुत्र सकाळी ६:४५ वाजता मोटारसायकलवरून बाहेर पडले. बाहेरगावी गेल्यानंतर फिर्यादींनी सायंकाळी ६:३० वाजता पत्नीला फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. वारंवार प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्याची विनंती केली.

​शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता, संबंधित महिला हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत आढळून आल्या. ही माहिती मिळताच, कुटुंबीय तातडीने घरी परतले. रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास ते बोल्हेगाव येथील घरी पोहचले. घरात पाहणी केली असता फरशीवर रक्ताचे थारोळे, तसेच एक चाकू आणि ब्लेडपान दिसून आले.

​महिलेला तातडीने अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या हनुवटीवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने कापलेल्या मोठ्या जखमा होत्या व त्यातून रक्तस्राव झाला होता.

​याप्रकरणी फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येची तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे. घरात घुसून अपंग महिलेवर हल्ला करत तिला ठार मारल्याने बोल्हेगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात मारेकऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles