अहिल्यानगर=महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना उपचारासाठी खासगी व जिल्हा रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत होती. मात्र, राज्य सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा देखील या योजनेत समावेश केला आहे. आता जिल्ह्यातील 102 प्राथमिक आरोग्य केंद्र व महापालिकेअंतर्गत असलेल्या नगर शहरातील 8 रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना उपचार मिळणार आहेत.महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनस्तरावरून ही योजना आरोग्य केंद्रांना जिल्हाभरात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून ग्रामीण स्तरावरील आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास हातभार लागणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या योजनेच्या माध्यमातून साथरोग, अपघात, सर्पदंश, विषबाधा, आश्वान दंश, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सामान्य प्रसूती आदी सेवा उपलब्ध असणार आहेत. पुढील काही महिन्यांत ही योजना आरोग्य केंद्रांसाठी लागू होणार आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
या आरोग्य योजनेंतर्गत गंभीर ते सामान्य अशा 1 हजार 356 हून अधिक प्रकारच्या आजारांवर आणि शस्त्रक्रियांच्या उपचारांचा समावेश आहे. यात हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण अशा मोठ्या शस्त्रक्रियांचाही समावेश होतो. जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अतुल गुंजाळ, डॉ. स्वप्निल तुपे, रोहित कारंडे यांच्या नेतृत्वात महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयांची नोंदणी सुरू झाली आहे.


