Friday, February 20, 2026

कै. वसंतराव दातीर यांचे सामाजिक कार्य दिशादर्शक ,सभापती प्रा. शिंदे यांचे गौरवोद्गार

कै. वसंतराव दातीर यांचे
सामाजिक कार्य दिशादर्शक

सभापती प्रा. शिंदे यांचे गौरवोद्गार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत संचार निगमचे (बीएसएनएल) निवृत्त अधिकारी (कै.) वसंतराव दातीर यांचे सामाजिक कार्य समाजाला दिशादर्शक आहे. केंद्र सरकारच्या नोकरीनिमित्ताने मुंबईसह विविध ठिकाणी काम करताना त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले. धनगर समाजाच्या वधु-वर परिचय मेळाव्यांची मुहूर्तमेढ रोवून यानिमित्ताने त्यांनी समाजाला एकत्रित आणण्याचा चांगला उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात रुजवला, असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
(कै.) वसंतराव दातीर यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी प्रा. राम शिंदे आज सोमवारी (15 डिसेंबर) सावेडीच्या पाईपलाईन रस्त्यावरील अहिल्यानगरमध्ये राहणार्‍या दातीर परिवाराच्या घरी आले होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षका श्रीमती निर्मला दातीर, डॉ. प्रशांत दातीर, पत्रकार निशांत दातीर, महसूल सहाय्यक श्रीकांत दातीर, डॉ. स्मिता दातीर, कृषी अधीकारी संजीवनी दातीर, इंजि. शोभा दातीर, संकेत शेंडगे, हर्षदा राहींज आदी कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला व (कै.) वसंतराव दातीर यांच्या आठवणींना उजाळा दिला. काही दिवसापासून ते आजारी होते. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती, असे प्रा. शिंदे यांनी सांगून ते म्हणाले, अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना सामाजिक विषयांवर वृत्तपत्रांतून लिखाणाची सुद्धा आवड होती. विविध ठिकाणी त्यांनी नोकरी करताना आपले सामाजिक कार्य सोडले नव्हते. समाजामधील गरीबांना मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असे. धनगर समाजाच्या वधु-वर परिचय मेळाव्यांसाठी पुढाकार घेऊन यानिमित्ताने त्यांनी समाजाला एकत्रितपणे आणून एक चांगला उपक्रम सुरू केला. समाजाला दिशादर्शक असे काम त्यांचे होते. त्यांचे जाणे कुटुंबासह समाजावरही आघात आहे. आम्ही दातीर कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी धनगर वधु-वर परिचय मेळाव्याचे संयोजक राजेंद्र तागड, सूर्यकांत तागड यांच्यासह सचिन पारखी, सतीश शिंदे, रोहन मांडे, तुषार यादव, ज्ञानदेव घोडके, ऍड वैभव आंधळे, अन्य उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles